Monday, 3 December 2012

घर घ्या पूर्व भागात


घर घ्या पूर्व भागात

बारा वर्षापूर्वी पुण्याच्या उत्तरेकडील भाग हा शहराचाच भाग आहे, असं पुणेकर मानत नव्हते. हॅरिस ब्रिजपर्यंतच पुणं, असंही काही पुणेकर मानायचे. येरवडा, खराडी, हडपसर, केशवनगर या ठिकाणी घर घेणा - यांची संख्याच कमी होती. ही सर्व गावंच होती. मात्र, खराडी, केशवनगर ही आता उपनगरं होऊ लागली असून, त्यांनी रिअल इस्टेट बाजारपेठेत एक वेगळा ठसा उमटविला आहे.

खराडी हे पुण्यातील आयटी कंपन्यांचं नवं डेस्टिनेशन होऊ पाहत आहे. या ठिकाणी तशा सुविधाही तयार झाल्या आहेत. स्थानिक बिल्डरांबरोबरच मोठे बिल्डरही या ठिकाणी नवे रेसिडेंशिअल आणि कमर्शिअल प्रोजेक्ट करत आहेत. खराडी हे हडपसरला एका बायपासनं जोडलं गेलं आहे. व्यावसायिक ठिकाणांच्या दृष्टीनंही या ठिकाणाला महत्त्व आहे. नगर रोड, सोलापूर रोड आणि मुंढवा या ठिकाणांहून खराडीला जाता येतं. पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या खराडीपासून रांजणगाव एमआयडीसीलाही जाणं सोपं आहे. गेल्या सहा वर्षांत रांजणगाव एमआयडीसीचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झाला असून, इथं अनेक बड्या कंपन्यांनी त्यांचे प्रोजेक्ट सुरू केले आहेत. त्यामुळे याठिकाणी काम करणारे अनेक लोक खराडीकडे होम डेस्टिनेशन म्हणून पाहत आहेत. या ठिकाणी आयटी कंपन्या असल्यानं तिथं येणार्या लोकांमुळे या ठिकाणाचं स्वरूप बदललं आहे. खराडी इथं अनेक बिल्डर्सनी प्रीमिअम हाउसिंग प्रोजेक्ट सुरू केले आहेत. प्रामुख्यान आयटी, मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणार्या लोकांचे प्रोफाइल डोळ्यासमोर ठेऊन प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. अर्धा कोटी ते एक कोटीच्या पुढं अशा भावातही या ठिकाणी घरं उपलब्ध आहेत. पुण्यातील एका रिअल इस्टेट कंपनीनं प्रीमिअम हाउसिंगसाठी ब्रँड तयार केला आहे आणि या ब्रँडअंर्गत पहिला प्रोजेक्ट याच ठिकाणी होत आहे. खराडीची ओळख ही प्रीमिअम हाउसिंग, अशीच होऊ लागली आहे. शहरापासून खराडी रस्त्यानं योग्यपद्धतीनं जोडलं गेलं आहे. वारजे ते रामवाडी हा मेट्रोचो पहिला रूट आहे. त्यामुळे भविष्यात या सुविधेमुळे येथून मुख्य शहरात येणं सोपं होणार आहे.

खराडीपासून थोडं पुढं वाघोली हे गावही आता पुण्याचा भाग होऊ पाहत आहे. या ठिकाणी अनेक नवे प्रोजेक्ट येत आहेत. पुण्यापासून वाघोली थोडं लांब असलं, तरी या ठिकाणी प्रामुख्यानं सामान्यांना घेता येऊ शकतील, असे प्रोजेक्ट येत आहे. वनबीएचके, टूबीएचके, थ्रीबीएचके, रोहाउस, बंगलो प्लॉट्स आदी पर्याय या ठिकाणी ग्राहकांना मिळू शकतात. वाघोलीपेक्षा जवळ मात्र खराडीपेक्षा तुलनेनं स्वस्त म्हणून केशवनगर भाग पुढं येत आहे. या ठिकाणीही अनेक मोठे बिल्डर प्रोजेक्ट करत आहेत. मुंढव्यापासून हा भाग जवळ आहे. मिड ते प्रीमिअम हाउसिंगमधील सर्व प्रकारचे प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहेत. खराडीला या ठिकाणाहून चांगली कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे आयटीमध्ये काम करणार्यांना केशवनगर हा घरासाठीचा नवा पर्याय म्हणून पाहता येऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत उंड्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. एनआयबीएम, कॅम्प या ठिकाणांपासून हा भाग जवळ आहे. त्यामुळे या ठिकाणी घर घेण्यास लोक प्राधान्य देत आहेत. उंड्री इथं काही भागात प्रीमिअम हाउसिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. काही ठिकाणी सामान्यांच्या आवाक्यातील घरं आहे. बंगला बांधण्याच्या विचारात असलेल्यांनाही या भागाचा विचार करता येऊ शकतो. सर्व प्रकारच्या घरांचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी घर घेण्याचा कल वाढत आहे.

पुण्याच्या पूर्वेकडील भागात घर घेण्याचा पर्याय हा वाघोली, खराडी, केशवनगर, हडपसर, मुंढवा, उंड्री एवढा मोठा आहे. त्यामुळे आपल्या बजेटनुसार घर घेता येऊ शकते. प्रत्येक ठिकाण हे मुख्य शहराशी जोडलेलं असून, येथील पायाभूत सुविधांचा विकासही होत आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागात घर घ्यायचं असल्यास या पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. 

No comments:

Post a Comment