Monday, 3 December 2012

सोलर आर्किटेक्चर


सोलर आर्किटेक्चर

 प्रत्येक व्यक्तीला आपल्या काम करण्याच्या जागेत जास्तीत जास्त मन:शांती मिळावी अशी अपेक्षा असते. पण प्रत्येकाला ती मिळते का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थी असते. या मन:शांतीचा निसर्गाशी काही संबंध आहे का? आणि असेल तर त्यासाठी काय करता येईल? तर याचे उत्तर आहे 'होय'. निसर्ग आणि घराचे खूप जवळचे नाते असते. मुख्यत: सूर्य आणि आपण बांधलेल्या वास्तूचा योग्य ताळमेळ जुळवून जास्तीत जास्त सुखकारक वातावरण आपण निर्माण करु शकतो.

ऑक्सफर्ड अॅटलासप्रमाणे नाशिक अक्षांश २०.०४ उत्तर व रेखांश ७३.५ पूर्व आहे. म्हणजे विषुववृत्तापासून २०.०४ अंश उत्तरेला व लंडनपासून ७३.५ अंश पूवेर्ला आहे. या दोन रेखांचा छेद म्हणजे नाशिक. या बिंदूंवर वर्षभरात, त्यातल्या त्यात उन्हाळयात व हिवाळयात काय होते हे समजले तर नाशिकमध्ये घरं बांधताना त्याचा मोठा फायदा होईल. या बिंदूवर म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या सीमा आणि साधारणपणे शंभर किलोमिटर त्रिज्येत येणाऱ्या किंवा उभ्या राहणाऱ्या सर्व इमारती आणि वास्तूंचा काय परिणाम होईल? हे लगेच समजेल. आपली बिल्डिंग उन्हाळयात कशी तापते व ती कमी तापदायक किंवा थंड कशी ठेवता येईल? तसेच हिवाळयात थंडीने कुडकुडत असलेले आपले घर उबदार ठेवण्याचा मार्ग काढता येईल. नाशिकशी सूर्याचे नाते कसे आहे, याचा अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. उन्हाळ्यात सूर्याची किरणे कशी पडतात, त्यातली भूमिती समजली तर आपण ती किरणे पाहिजे तेव्हा अडवू शकतो आणि सावल्या निर्माण करुन त्यात राहू शकतो. हिवाळयातील सूर्याची किरणे खोलवर आत घेऊन आपली वास्तु उबदार ठेवू शकतो.

२१ जानेवारी या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या अंदाजे १९.९७७ अंश दक्षिणेला असतो. दुपारी १२.३६ वाजता तो अंदाजे ५०.००३ अंश असतो. यावेळी त्याचा जमिनीपासून ५० अंशाचा कोन तयार होतो. २१ फेब्रुवारीला हाच कोन ५९.१४७ अंश असतो. मार्चमध्ये तो ६९.९८ अंश, एप्रिलमध्ये ८१.६४७ अंश तर मेमध्ये तो एकदम डोक्यावर म्हणजे ९०.००३ अंशाच्या काटकोनात असतो. त्यामुळे तो एकदम माथ्यावर असतो. जूनमध्ये तो नाशिकच्या उत्तरेला सरकतो व जमिनीपासून त्याचा कोन ९३.४४६ अंश इतका होतो. जानेवारीपासून जूनपर्यंत तो उत्तरेकडे सरकत असतो. जुलैमध्ये तो मे महिन्याच्या स्थितीत असतो. मग पुन्हा हळुहळू तो दक्षिणेकडे सरकत जातो. ऑगस्टमध्ये एप्रिलच्या स्थितीत, सप्टेंबरमध्ये मार्चच्या स्थितीत, ऑक्टोबरमध्ये फेब्रुवारीच्या स्थितीत तर नोव्हेंबरमध्ये तो पुन्हा जानेवारीच्या स्थितीत येतो. डिसेंबरमध्ये त्याचा कोन ४६ अंश इतका असतो.

या अभ्यासाच्या सहाय्याने आपण वास्तू बांधण्याची विशिष्ट दिशा तसेच खिडक्या, दरवाजे इत्यादींची योग्य जागा ठरवू शकतो. आता आपल्या किचनचे उदाहरण घ्या. हिवाळयात आपणा सर्वांनाच सकाळच्या वेळी सूर्याची किरणं घरात हवी असतात. मग सौरतक्त्याचा अभ्यास करुन आपण आपले किचन आग्नेय बाजूला ठेवले तर सकाळी ऐन थंडीत कोवळी उन्हं आपल्या किचनमध्ये येऊ शकतात. वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघर आग्नेय्येला असावं असं सुचविलेलं आहे. विशेष म्हणजे त्याच भागाला उन्हाळयात उन्हाचाही त्रास होणार नाही. कारण उन्हाळयात सूर्य उत्तरायणामुळे उत्तरेकडे सरकतो. घराच्या छताची आकाश रेखा सूर्यकिरणांच्या भूमितीनुसार घेऊन छपरांवर निर्माण होणारी उष्णता त्याच जागेवर कमी करु शकतो. सूर्याच्या किरणांचे छपरावर जितके कमी अंशाचे लघुकोन होतात, तितकी कमी उष्णता निर्माण होते. आपल्या खिडक्यांवरचे छज्जे, पडद्या वगैरेंचा विचार सूर्याच्या दिशेप्रमाणे केला तर निश्चितच जास्त काळ सावल्या निर्माण होऊन गारवा निर्माण होईल. त्याचप्रमाणे झाडे, वेली, लॉन इत्यादींच्या सहाय्याने ऊन-सावल्यांच्या आकर्षक रचना निर्माण होऊन वास्तु थंड ठेवू शकतो.

शक्यतो उत्तरेकडून मंद व न झगमगणारा नैसगिर्क प्रकाश आपण आपल्या वास्तुंसाठी घेऊन योग्य ठिकाणी विविध प्रकारचे आरसे लावून, दृकशास्त्राच्या ज्ञानाचा वापर करुन हवा तितका प्रकाश घेऊन आपल्या विजेच्या बिलाचे पैसे वाचवू शकतो. त्याचप्रमाणे वर्षभर वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशांचा अभ्यास करुन खिडक्यांची रचना करता येते. खिडकीतून घरात येणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात सुगंधी वेल, वनस्पती असली तर घरात दिवसभर छान सुगंध दरवळेल.

No comments:

Post a Comment