Monday, 3 December 2012

घराचे बजेट कसे करावे?


घराचे बजेट कसे करावे?

बजेट करणे हा आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे. कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च करायचा आहे हे ठरलेले नसेल तर आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी बचत करताना अडचणी येऊ शकतात. तसेच, जेव्हा गरज असेल तेव्हा पैसे हातात नाहीत, असे होऊ शकते. त्यामुळे घराचे बजेट करण्यापूर्वी पुढील प्रश्नांची उत्तरे मिळवावीत.
.....

तुमचे मूळ उत्पन्न किती आहे?

मूळ उत्पन्न म्हणजे दरमहा किती रक्कम आपल्या हातात येते, म्हणजेच ' टेक होम ' सॅलरी. ' सीटीसी ' म्हणजे उत्पन्न धरू नये, कारण त्यातील काही रक्कम वर्षाच्या शेवटी तुमच्या हातात येते. तसेच, तुम्हाला ठरवून दिलेली ' व्हेरिएबल पे ' ची संपूर्ण रक्कम प्रत्यक्षात मिळेलच असे नाही. त्यामुळे अशा अनियमित उत्पन्नावर अवलंबून राहू नये. बोनस, डिव्हिडंड व आर्थिक भेट हेही गृहित धरू नये. मासिक उत्पन्न मोजताना भाडेरूपी उत्पन्न त्यामध्ये समाविष्ट करता येईल.

तुमचा खर्च किती?

गेल्या सहा महिन्यांतीसिर्व बिले व पावत्या एकत्र घ्या. त्यानंतर, किती खर्च केला आहे आणि काय खरेदी केली आहे, याची यादी करा. त्यामध्ये किराणा सामानापासून जिमच्या फीपर्यंत सगळा खर्च समाविष्ट करा. वर्तमानपत्रचे बिल, कार धुण्याचा खर्च अशा बारीकसारीक गोष्टीही विसरू नका. कोणताही तपशील राहू नये म्हणून क्रेडिट कार्ड व बँक अकाउंट स्टेटमेंट तपासून घ्या. एटीएममधून किती पैसे काढले होते व त्याचे काय केले, याचीही आठवण यामुळे होईल. महिन्याच्या सरासरी खर्चाचा अंदाज येईपर्यंत दोन ते तीन महिन्यांच्या खर्चाचा सविस्तर तपशील विचारात घ्या. यामध्ये दोन प्रकारे वर्गवारी करा - शाळेची फी, घरभाडे असे न टाळण्यासारखे खर्च आणि बाहेर जेवायला जाणे, असे पर्यायी खर्च. खर्चात कपात कुठे करता येईल, याचा अंदाज यावरून येईल.

तुमची आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत?

तुमची सव आर्थिक उद्दिष्ट्ये आणि ती साध्य करण्याचा कालावधी विचारात घ्या. पुढच्या काही महिन्यांत लॅपटॉप घेण्यापासून ते निवृत्तीनंतरचं आयुष्य निवांत घालवण्यापर्यंत सगळ्या इच्छा लिहून काढा. तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर त्याच्या परतफेडीचा समावेश आर्थिक उद्दिष्ट्यांमध्ये करावा. दीर्घकालीन उद्दिष्ट्याच्या बाबतीत महागाई विचारात घेऊन त्याचा खर्च किती असेल ते नमूद करा. महागाई विचारात न घेतल्यास ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या वेळी पैसे कमी पडू शकतात. इंटरनेटवर विविध प्रकारचे महागाईचे कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. त्यांची यासाठी मदत घेता येईल.

बचत किती आहे?

' ईपीएफ ' असेल वा एखादी विमा योजना, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तुमची बचत असल्याचे गृहित धरू. अशी सगळी गुंतवणूक आणि त्यातून प्रत्यक्ष हातात पैसे कधी मिळू शकतील, त्याची यादी करावी. या रकमेतून एखादे आर्थिक लक्ष्य साधले जाईल का ते पाहावे. विशिष्ट काळानंतर बचतीची रक्कम किती होईल, ते समजून घेण्यासाठी ' फायनल वर्थ ऑफ इन्व्हेस्टमेंट ' कॅल्क्युलेटर वापरावा.

फरक किती आहे?

तुमची सर्व दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी किती निधी लागेल, ते मोजा. तसेच, त्यापैकी कितीसाठी तुमच्या सध्याच्या बचतीचा वापर करता येईल, त्याचाही अंदाज घ्या. त्यातील फरकातून लक्षात येईल की आणखी किती बचत करणे गरजेचे आहे. विशिष्ट काळात आर्थिक लक्ष्य साध्य करण्यासाठी दरमहा किती रुपये गुंतवायला हवेत ते जाणून घेण्यासाठी ' सेव्हिंग्स टारगेट ' कॅल्क्युलेटर वापरावा. तो इकॉनॉमिक टाइम्सच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दरमहा गुंतवता येईल इतकी पुरेशी रक्कम तुमच्याकडे आहे का? गुंतवता येईल अशी रक्कम नसेल तर तुमच्या खर्चांचा आढावा घ्या आणि त्यापैकी किती कमी करता येतील त्याचा विचार करा. जसे की, काही दिवस तुम्हाला कारचा वापर कमी वा बंद करून इंधनावरील खर्च वाचवता येईल का? बाहेर जेवायला जाण्याचा खर्च एकदा वाचवता येईल का? तुमच्याकडे खर्चासाठी आवश्यक रकमेपेक्षा अधिक पैसे असतील तर ते कुठेतरी गुंतवण्याचा विचार करता येईल. त्यासाठी फायनान्शिअल प्लॅनरची मदत घेता येईल. तुम्ही किती जोखीम घेऊ शकता त्यानुसार योग्य त्या पर्यायात पैसे गुंतवता येतील

No comments:

Post a Comment